इतिहासाचा लेखाजोखा
इतिहासात डोकावण्याची सवय जशी अभ्यासकांना असते, तशी ती सामान्य व्यक्तींनाही असते. या डोकावण्याच्या हेतूंमध्ये मात्र फरक असतो. अभ्यासक इतिहासाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी, घटनांचा नवा अर्थ शोधण्यासाठी तर सामान्य व्यक्ती केवळ उत्सुकतेपोटी किंवा इतिहासातील भव्य गोष्टींविषयी असलेल्या आकर्षणापोटी इतिहासात डोकावतात.
असं असलं तरी इतिहासाच्या आवडीने त्या वाटेला जाणा-यांची संख्या कमीच असते. कारण असतं, इतिहासातील गुंतागुंत, सणावळ्या. पण हाच इतिहास जर साध्या आणि सोप्या पद्धतीने करून सांगितला तर इतिहासापासून पळणारे त्याच्या जवळ येतील. इतिहासात डोकावण्याची, तो माहीत करून घेण्यासाठीचं एक हटके संकेतस्थळ म्हणजे Maps-of-War.com
जगाचा इतिहास युद्धावरच आधारित आहे, असं म्हटलं जातं. या युद्धांतून काय साध्य झालंय, हा वादाचा प्रश्न असला तरीही युद्धामुळे झालेल्या बदलांचा परिणाम अनेक पिढय़ांवर झाले आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. युद्धाविषयी वृत्तपत्रं आणि टीव्हीच्या माध्यमातून ज्या काही बातम्या कळतात, त्यातून युद्धाबद्दल सर्व माहिती मिळतेच असं नाही. नेमका हाच उद्देश ठेऊन निर्मात्याने हे संकेतस्थळ तयार केलं आहे.या संकेतस्थळाच्या नकाशे ((Maps) या विभागात मुख्य सात नकाशे दिले आहेत. यातील पहिल्या नकाशात (March-of-Democracy) जगातील लोकशाहीचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली आहे. चार हजार वर्षातील लोकशाहीचा प्रवास ९० सेकंदांमध्ये दाखवला गेला आहे.
History-of-Religion मध्ये पाच हजार वर्षात जगातील कोणत्या देशात कोणता धर्म वाढला याची माहिती दिली आहे. जगातील विविध धर्मात हिंदू, ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, बैद्ध हे धर्म कसे वाढत गेले याची माहिती यातून मिळते.जगावर नजर ठेवून असणा-या अमेरिकेने आपलं वर्चस्व राखण्यासाठी अनेक देशांवर युद्ध लादलं किंवा युद्धासाठी आर्थिक मदत केली. या देशाच्या २३१ वर्षाच्या इतिहासात कोणत्या अध्यक्षाने व पक्षाने आपल्या कार्यकाळात किती देशांत युद्ध केलं, त्या युद्धात किती जण ठार झाले, हा इतिहास समजून घेणं बदलत्या जागतिक परिस्थितीत गरजेचं ठरतं. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ते सध्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांच्या कार्यकाळातील युद्धाची माहिती घेण्यासाठी Leadership-and-War यावर क्लिक करायलाच पाहिजे.मध्यपूर्व आशिया हा भूभाग जागतिक राजकारणाच्या दृष्टीने कायम महत्त्वाचा ठरला आहे. या भूभागावर कोणी, किती काळ राज्य केलं, बदलत्या राजकीय परिस्थीतीत या प्रदेशावर नव्या देशांचा झालेला जन्म इत्यादी माहिती Imperial-History यामध्ये मिळते. विशेष म्हणजे या संकेतस्थळावरील सर्व नकाशे हे नेहमीच्या स्थिर पद्धतीने न देता ते मल्टीमीडियाच्या स्वरूपात दिले आहेत. त्यामुळे इतिहासात डोकावणं जास्त गुंतागुतीचं होत नाही.
संकेतस्थळावरील LIBRARY या विभागात युद्धविषयक जगातील काही महत्त्वाच्या संकेतस्थळांच्या लिंकही देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीपासून सध्या अमेरिकेने सुरू केलेल्या अफगाण आणि इराकमधील बगदाद युद्धाची माहिती मिळते. या संकेतस्थळावरील नकाशे डाऊनलोड करण्याची सोय आहे. त्याचबरोबर हे नकाशे व्यावसायिक, शैक्षणिक कारणासाठी वापरता येतात. त्यासाठी फक्त औपचारिक परवानगी घेणं आवश्यक असतं. याशिवाय तुमच्याकडील युद्धाविषयीची माहितीही तुम्ही पाठवू शकता. येथील माहिती वापरताना फक्त संदर्भ म्हणून त्याचा उल्लेख करावा इतकीच अपेक्षा याच्या निर्मात्यांची आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Maps-of-War वरील नकाशे तुम्ही तुमच्या स्वत:च्या संकेतस्थळावर अथवा /blog वरही आणू शकता. त्यासाठी करायची पद्धतीची माहिती इथे दिली आहे. Maps-of-war ने जगातील युद्धांची माहिती देणाऱ्या मल्टीमीडिया नकाशे असणा-या संकेतस्थळाची यादी दिली आहे. अधिक माहितीसाठी त्यावर क्लिक करण्यास हरकत नाही. Maps-of-warवरील सर्व नकाशे संशोधनपूर्ण आहेत. त्यामुळे हा इतिहास माहीत करून घेताना जगाच्या अभ्यासाला सुरुवात होते.
3 comments:
in just one word :- Great
ही site ekdam chaan aahe bhyasa sathi.
tuzhe abhinandan itkya information दर veli amhala detos.
asach pudhe जा mitra.
good onede
Post a Comment