Friday, November 20, 2009

फोटोस्टुडिओ घरच्या घरी

स्वत:चे फोटो एडिट करायचे असतील, त्यांना स्पेशल इफेक्ट द्यायचे असतील तर आता फोटो स्टुडिओचा रस्ता धरण्याचं कारण नाही. कारण ही सोय आता काही संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

सुखद आठवणींचे क्षण फोटोच्या माध्यमातून कायम जपता येतात. त्यामुळे फोटो हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे आपले फोटो एडिट करण्यासाठी आणखी एका भन्नाट संकेतस्थळाबद्दल माहिती घेऊ या. मागच्या भागात आपण बी फंकी या संकेतस्थळाच्या माध्यमातून फोटोवर सहज करता येतील अशा काही इफेक्ट्सबद्दल माहिती करून घेतली होती.

आपल्या घरातील फोटो मग ते एखाद्या समारंभाचे असो की सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन साज-या केलेल्या एखाद्या सणाचे किंवा मग कॉलेजमधील मित्रांसोबत केलेली धम्माल. अशा फोटोवर काही एडिटिंग करायचं झाल्यास आपण सरळ एखाद्या महागड्या फोटो स्टुडिओची वाट धरतो आणि तो सांगेल ते पैसे मोजून मोकळे होतो.

पण यावर उपाय आहे तो म्हणजे LoonaPix.com या संकेतस्थळावर स्मार्ट क्लिक करण्याचा. हे संकेतस्थळ तुम्हाला फोटो एडिटिंगची सेवा देतं. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच पैसे मोजावे लागत नाहीत. संगणक वापरण्याच्या किमान कौशल्यांद्वारे तुम्ही तुमच्या फोटोना कुल लुक देऊ शकता.

या संकेतस्थळावर मुख्य चार प्रकारे फोटो एडिट करता येतात.

पहिला प्रकार म्हणजे LoonaPic Effect यामध्ये एकूण ८३ प्रकारे तुम्ही फोटो एडिट करू शकता. चित्रपटातील स्टार्सप्रमाणे आपणही कुठेना कुठे झळकावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शहरातील किंवा शॉपिंग मॉलमधील मोठमोठ्या होर्डिग्सवर अनेक हॉलिवुड आणि बॉलिवुड अभिनेत्री आणि अभिनेत्याचे फोटो आपण पाहत असतो. प्रत्यक्षात अशा होर्डिग्सवर आपले फोटो येणार नाही हे माहीत असतं. तरीही आपण त्या होर्डिगवर कसे दिसू हा विचार मनोमनी येऊन जातोच. प्रत्यक्षात हे शक्य नसलं तरी या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरी आपण आपल्याकडील फोटोंवर काम करून ही कल्पना आपल्यापुरती का होईना प्रत्यक्षात आणू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे ८३ प्रकारे तुम्ही तुमचा फोटो वेगवेगळ्या होर्डिग्सवर झळकवू शकता.

Face Effect यामध्ये तुम्ही चित्रपटातील अभिनेता अथवा अभिनेत्रीच्या जागी स्वत:चे फोटो लावू शकता. लगे रहो मुन्नाभाईचित्रपटातील लकी सिंग तुम्हाला नक्की आठवत असेल. तो ज्या प्रमाणे जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तीसोबत फोटो काढतो त्या प्रमाणे तुम्ही या संकेतस्थळावर हॉलिवुड अभिनेता आणि अभिनेत्री, टेनिसपटू, फुटबॉल खेळाडू यांच्यासोबत स्वत:चे फोटो तयार करू शकता किंवा त्यांच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो लावू शकता.

Photo Frames यामध्ये तुम्ही तुमच्याकडील फोटोजना त्यातील प्रसंगानुसार इफेक्ट देऊ शकता. यामध्ये वाढदिवसासाठीचे, मैत्रीसाठीचे अशा अनेक खास फ्रेम आहेत. एकूण २७३ फोटो फ्रेममधून तुम्ही तुमच्या फोटोसाठी योग्य ती फ्रेम निवडू शकता.

Photo Trim या मध्ये तुम्ही तुमचे फोटो विविध प्रकार आणि आकारात बसवू शकता. या विभागात दिलेल्या ३३ प्रकारच्या आकारांमध्ये तुम्ही फोटो बसवू शकता. या संकेतस्थळावर लॉग इन करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या फोटोंना दिलेल्या इफेक्टनंतर या संकेतस्थळावरील गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. हे सेव्ह केलेले फोटो इतर जणही वापरू शकतात. त्यामुळे फोटो सेव्ह करताना मात्र योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या MySpace, Facebook, Orkut, Hi5 आदी प्रोफाइलच्या फोटोजना कुल लुक देण्यासाठी या संकेतस्थळाचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. ज्यांना फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशनचं महत्त्व कळतं ते असा स्मार्ट क्लिक करण्यास उशीर करत नाहीत. या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्ही फोटो एडिटिंग आणि स्पेशल इफेक्टिंगसाठी फोटो स्टुडिओचा रस्ता विसरल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

1 comments:

Anonymous April 2, 2010 at 5:19 PM  

वो!!!!!!!!!! the site is too cool.

u said it right we get a feel of "luckysingh" of munnabhai film.

its great yaar.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP