Tuesday, October 12, 2010

भारतीय रुपयासाठीच्या चिन्हाला युनिकोड मान्यता

भारतीय रुपयासाठीच्या नव्या चिन्हाला युनिकोड मान्यता मिळाली आहे. जुलै महिन्यात भारत सरकारने रुपयासाठी नवे चिन्ह जाहीर केले होते. हे चिन्ह लवकरच सर्वसाधारण की-बोर्डवर तसंच विविध फाँटमध्ये उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं होतं. पण त्याच्या निश्चित कालावधीबाबत शंका होती. त्यानंतर मंगळूर येथील एका फाँटद्वारे ` हे चिन्ह उपलब्ध करून दिलं गेलं. मात्र ` चिन्हाला जागतिक मान्यत मिळण्यासाठी आणि की-बोर्डवर दिसण्यासाठी त्याला जागतिक युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेची मान्यता मिळणं आवश्यक होतं. या संघटनेकडून युनिकोडच्या नव्या फाँट आणि चिन्हांना मान्यता दिली जाते.

युनिकोड संघटनेकडून नुकतेच युनिकोड 6.०.० व्हर्जन लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 288 नव्या अक्षरांना जागा देण्यात आली आहे. भारतीयांसाठी नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यात भारतीय रुपयासाठी वापरण्यात येणा-या चिन्हालाही स्थान देण्यात आलं आहे. भारतीय रुपयाच्या चिन्हासाठी U+20B9 हा कोड देण्यात आला आहे. युनिकोडचे नवे व्हर्जन संगणक आणि मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तो सहज वापरता येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मार्क डेविस यांनी सांगितले. ` चिन्हाला युनिकोड मान्यता मिळाल्यामुळे काही महिन्यांतच तो डॉलर ($) युरो () प्रमाणे लिहिण्यास सहज उपलब्ध होणार आहे. HTML चा वापर करणारे &#x20b9या कोडद्वारे ` हे चिन्ह मिळवू शकतात.

जगातील आघाडीच्या संगणक कंपन्या खास भारतीय बाजारपेठेसाठी ` या चिन्हाचा समावेश असलेल्या की-बोर्डची निर्मिती करत आहेत. चिन्हाचा युनिकोडमध्ये समावेश झाल्याने आता तो संगणकासह भारतातील मोबाइलच्या की-पॅडवरही दिसणार आहे. युनिकोडच्या नव्या व्हर्जनमध्ये मोबाइल फोनसाठी नवं चिन्ह सहज वापरता येईल, याचा विचार करण्यात आला आहे. युनिकोडच्या या नव्या व्हर्जनची सध्या अंतिम चाचणी सुरू असून काही महिन्यांतच ते मोफत उपलब्ध होणार आहे.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP