नेट अपडेट- आता गुगलचा जी-फोन
आता गुगलचा जी-फोन
इंटरनेट वापरणा-या प्रत्येकाला गुगलच्या विविध सेवा वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच प्रत्येकाला गुगल नव्याने काय करणार आहे याची उत्सुकता असते. सध्या गुगलच्या एका नव्या उत्पादनाबद्दल नेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. ते उत्पादन म्हणजे ‘जी-फोन’. गुगल पुढील वर्षात स्वत:चा मोबाइल बाजारपेठेत आणणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट मोबाइल फोनची विक्री थेट ग्राहकाला केली जाणार आहे. गुगल आणि तैवान येथील एचटीसी कॉपरेरेशन मिळून या मोबाइलची निर्मिती करणार आहे. एचटीसी कॉपरेरेशन स्मार्ट फोन उत्पादनांच्या जागतिक ब्रँडमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या मोबाइलमधील सॉफ्टवेअर आणि डिझाइन गुगलचे असणार आहे. गुगलच्या या आगामी मोबाइल फोनचे बारसेसुद्धा झाले आहे. ‘नेक्सस वन’ या नावाने गुगल हा मोबाइल बाजारपेठेत आणणार आहे.
- सध्या नेक्सस वनची पहिली आवृत्ती गुगलच्या कर्मचा-यांसाठी उपलब्ध झाली आहे.
- वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार गुगल या मोबाइलची विक्री ऑनलाइन करणार आहे.
- इंटरनेटच्या विश्वात ज्याप्रमाणे गुगलने अन्य स्पर्धकांना मागे टाकले त्या पार्श्वभूमीवर हा जी-फोन काय कमाल करतो हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावीच लागेल.
0 comments:
Post a Comment