Friday, March 26, 2010

तेव्हा... आणि आता

गुगल, याहू, टाइम्स, एपल, मायक्रोसॉफ्ट या वेबसाइट्सची साच्यातील होमपेजेस बघायची आपल्याला इतकी सवय झालेली असते की माहित असलेलं होमपेज उघडलं नाही तर त्यासाठी आपण खूप खटाटपी करतो. इंटरनेटच्या पसा-यात अनेक वेबसाइट्च्या होमपेजेसने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. इंटरनेटच्या विश्वात अधिराज्य गाजवणा-या या वेबसाइट्सची सुरुवात कशी झाली, याबद्दल आपण अनेक किस्से ऐकले असतील. मात्र अगदी सुरुवातीला विशिष्ट वेबसाइटचं होमपेज कसं होतं ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का हे वाचल्यावर गुगल, याहू, टाइम्स, एपल, मायक्रोसॉफ्ट या वेबसाइटच्या होमपेजबद्दल तुमच्या मनात निश्चितच कुतूहल निर्माण झालं असेल. यातील काही वेबसाइट्सच्या प्रारंभीचे आणि आताचे इंटरेस्टिंग होमपेजेस....


1999

2009


1999


2009


1999



2009



1999



2009


1999


2009



1999



2009


1999


2009


1999


2009

Saturday, March 20, 2010

पुस्तक वाचा, पुस्तक ऐका


‘स्मार्ट क्लिक’च्या मागील भागात ऑनलाइन दुर्मिळ पुस्तकांच्या वेबसाइटची माहिती आपण घेतली. इंटरनेटवर ही पुस्तकं मोफत वाचता येतात तशी ऐकताही येतात. अशा काही वेबसाइट्स इंग्रजीप्रमाणेच मराठीतही उपलब्ध आहेत. त्याविषयी..

आपल्या धकाधकीच्या दैनंदिनीत स्वत:साठी वेळ काढणं तसं कठीणच असतं. त्यात दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकं वाचण्याची इच्छा असूनही अनेकांची वाचनाची इच्छा अपूर्णच राहते. मात्र काही पुस्तक वाचण्याची सवय (एका ठिकाणी निवांतपणे बसून) नसल्यामुळे वेळ मिळत नसल्याने किंवा हवा तसा निवांतपणा न मिळाल्याने वाचनाच्या आनंदावर पाणी सोडावं लागतं. अशा मंडळीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पुस्तक ऐकण्याची सोय देणा-या इंटरनेटवरील वेबसाइट्स पर्वणी ठरल्या आहेत. इंग्रजी भाषेमध्ये अनेक पुस्तकं ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेतच. पण आता मराठीमध्येही असे प्रयोग छोट्या प्रमाणात सुरू झाले आहेत.

www.booksshouldbefree.com ही पुस्तकं ऐकण्यासाठी इंग्रजीतील एक उत्तम वेबसाइट आहे. या वेबसाइटवर 48 विभागात पुस्तकांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यात जगभरातील 25 भाषांतील पुस्तकं उपलब्ध आहेत. या वेबसाइटवरील पुस्तकं एमपी थ्री, आय टय़ूब्ज स्वरूपात डाऊनलोड करून घेता येतात. या वेबसाइटवरील वाचनासाठी म्हणजेच ऐकण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांविषयी थोडक्यात माहितीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लॉग-इन करण्याची आवश्यकता नाही.

आज तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग पाहता भविष्यात पुस्तकं वाचण्याऐवजी ऐकली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे एका ठिकाणी बसून पुस्तकं वाचणं ज्यांना शक्य नसतं त्यांच्यासाठी तर ही वेबसाइट फारच उपयुक्त आहे. मात्र इथे सध्या मराठी पुस्तकं उपलब्ध नाहीत.

मराठी पुस्तक ऐकण्यासाठी boltipustake.blogspot.com ब्लॉगवर आपल्याला क्लिक करावं लागेल. या ब्लॉगवरून मराठीतील काही जुनी पुस्तकं एमपी-थ्री स्वरूपात डाऊनलोड करता येतात. त्यासाठी कोणत्याही लॉग-इनची आवश्यकता नाही. साने गुरुजी यांच्या अनमोल गोष्टी श्यामची आई या दोन पुस्तकांसह आगरकर दर्शन आणि लोकहितवादींची शतपत्रं ही पुस्तकं सध्या या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. शिवाय या ब्लॉगवर तुम्ही स्वत:च्या आवाजात पुस्तक वाचून पाठवू शकता. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर मोफत मिळवण्याची माहितीही इथे देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आज मराठीतील जवळपास सर्व प्रकाशन संस्थांची स्वतंत्र वेबसाइट आहे. या वेबसाइटवरून आपण पुस्तकं विकत घेऊ शकतो. याशिवाय www.rasik.com आणि www.marathisahitya.com यांसारख्या वेबसाइट्सवरही मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यावरूनही पुस्तकं विकत घेता येतात. केवळ सह्याद्री पर्वतरांगांशी निगडित पुस्तकं विकत घेण्यासाठी www.sahyadribooks.org ही वेबसाइट उपयुक्त आहे. या वेबसाइटवरील पुस्तकं तर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. कादंबरी वाचनाची आवड असणा-यांसाठी www.marathinovels.net ही खास वेबसाइट उपलब्ध आहे. अर्थात हा एक ब्लॉग असून इथे अनेक कादंब-या ऑनलाइन वाचण्याची सोय आहे.

पण मराठी मासिकं आणि पुस्तकं फुकटात वाचायची असतील तर ebooks.netbhet.com ही वेबसाइट परफेक्ट आहे. या वेबसाइटवर मराठीमधील अनेक मासिकं आणि पुस्तकं डाऊनलोड करून घेता येतात. ही वेबसाइट केवळ मराठी पुस्तकांपुरती मर्यादित नसून अनेक महत्त्वाच्या लिंकही त्यावर पाहायला मिळतात. मराठी इंटरनेट विश्वाबद्दल अधिक रस असलेल्या नेटकरांनी हे क्लिक जरूर करायला हवेत.

एम्प्लॉयमेंट न्यूज : सर्वोत्तम


देशभरातील युवकांना रोजगारविषयक माहिती उपलब्ध करून देणा-या सरकारच्या एम्प्लॉयमेंट न्यूज या वेबसाइटला रोज तीन लाख हिट्स मिळतात. सरकारी वेबसाइटमध्ये सर्वाधिक यशस्वी वेबसाइट असल्याची माहिती अर्थसंकल्पीय कागदपत्रात नमूद करण्यात आली आहे.

देशभरात विविध क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींविषयी माहिती, करिअरविषयक सल्ला, ई-मेल अलर्ट, देशातील महत्त्वाच्या परीक्षांची वेळापत्रकं या वेबसाइटवर दिली जातात. डिसेंबर २००९ पर्यंत या वेबसाइटने पाच लाख ५६८ रुपये एवढं उत्पन्न मिळवलं आहे.

मराठी वेबसाइट्स स्पर्धा

मराठी वेबसाइट्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मराठी भाषेतील वेबसाइटसाठी खुली स्पर्धा आयोजित केल्याची माहिती या पूर्वी आम्ही दिली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून स्पर्धक आता 26 मार्चपर्यंत आपला सहभाग नोंदवू शकतात.


ही स्पर्धा शासकीय आणि अशासकीय वेबसाइट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन प्रवेशपत्रिका राज्य सरकारच्या www.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटवर तसंच rmvs.maharashtra.gov.in, www.cdacmumbai.in, bosslinux.in/support-centres/mumbai या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहेत.

Friday, March 12, 2010

दुर्मीळ खजिना ऑनलाइन


दुर्मीळ पुस्तकं मिळवण्यासाठी आता ग्रंथालयाची वाट धरण्याची आवश्यकता नाही. कारण मराठीसह संस्कृत, इंग्रजी, बंगाली, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, उर्दू या नऊ भारतीय भाषांतील जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं केंद्र सरकारने डिजिटल लायब्ररी स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध केली आहेत.


आजच्या युगात रोज घडणा-या घटनांची तपशीलवार माहिती छायाचित्रं आणि व्हिडिओसह इंटरनेटवर लगेचच सहज उपलब्ध होत असते. तरीही काही वर्षापूर्वीचे जुने संदर्भ मिळवण्यासाठी कित्येकदा बराच सर्च करावा लागतो. इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अगदी सर्व प्रकारच्या खरेदीची सोयही नेटवर उपलब्ध आहे. त्यात पुस्तकांचाही समावेश होतो. इंटरनेटवरून पुस्तक विकत घेण्याबरोबर ती वाचण्याची सोयही उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी हवी.

बाजारपेठेत आलेली नवी पुस्तकं इंटरनेटवर सहजरीत्या उपलब्ध आहेत. मात्र जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं वाचायची असतील किंवा त्यामधील काही संदर्भ हवे असतील तर मात्र काही मोजक्या शहरातील मोठ्या ग्रंथालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. अशी जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं संदर्भासाठी पटकन मिळाली तर अभ्यासक आणि साहित्यप्रेमींना याचा मोठा उपयोग होऊ शकतो. या दुर्मीळ पुस्तकांचं जतन करणं ही ब-यापैकी कठीण आणि खर्चिक गोष्ट असते. पण प्रत्येकालाच हे शक्य होईलच असं नाही. अशी दुर्मीळ पुस्तकं मिळवण्यासाठी आता ग्रंथालयाची वाट धरण्याची आवश्यकता नाही. कारण मराठीसह संस्कृत, इंग्रजी, बंगाली, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, उर्दू या नऊ भारतीय भाषांतील जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं ऑनलाइन उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने ही पुस्तकं डिजिटल लायब्ररी स्वरूपात उपलब्ध केली आहेत.

या वेबसाइटवर मराठीतील तब्बल एक हजार सात जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं (सुमारे दोन लाख 86 हजार 265 पानं) उपलब्ध आहेत.

देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांतील पुस्तकंही या डिजिटल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ, मुंबईतील गव्हर्मेट सेंट्रल प्रेस आणि मुलुंड येथील डिजिटल लायब्ररीची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे; तर राष्ट्रपती भवनाच्या ग्रंथालयातील जवळ जवळ पाच हजार पुस्तकं या वेबसाइटवर वाचनासाठी उपलब्ध आहेत. या वेबसाइटवरील पुस्तकांचा शोध पुस्तकांच्या तसेच लेखकांच्या नावानुसार, प्रकाशन वर्षानुसार त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या नावानुसार घेता येतो.

देशातील तब्बल एक लाख 78 हजार 376 जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांचा (6,05,57,257 पानं) मोफत खजिना या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पुस्तकांबरोबरच नियतकालिकं, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. याखेरीज या वेबसाइटवर अनेक महत्त्वाच्या लिंकही उपलब्ध आहेत. त्यावर क्लिक करून आणखी नव्या खजिन्यांचा आनंद लुटणं शक्य आहे.

तेव्हा पुस्तकांचा हा खजिना मिळवण्यासाठी लॉग ऑन करा- http://www.new.dli.ernet.in


Friday, March 5, 2010

मराठी वेबसाइटसाठी स्पर्धा

इंटरनेटची भाषा इंग्रजी असल्यामुळे अन्य भाषांमधील वेबसाइटसाठी हे माध्यम भाषेच्या अडचणीमुळे गरसोयीचं ठरत होतं. आता मात्र युनिकोड फॉन्टच्या सुविधेमुळे ही अडचण दूर झाली आहे. यामुळेच मराठी भाषेत बातम्यांसोबतच, अन्य विषयांना प्राधान्य देणाऱ्या नव्या वेबसाइटची निर्मिती होत आहे. या वेबसाइटवर काही नवे नवे प्रयोग होत आहेत. अशा मराठी वेबसाइट्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मराठी भाषेतील वेबसाइटसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.


इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आता मराठीमध्ये विविध वेबसाइटची निर्मिती होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेने, सी-डॅक आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने मराठी वेबसाइटसाठी ही खुली स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शासकीय आणि अशासकीय वेबसाइट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.


पहिल्या शासकीय गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार आणि पाच हजार रुपयांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. तर अशासकीय गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पस्तीस हजार, वीस हजार आणि पंधरा हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.


यासाठी ऑनलाइन प्रवेशपत्रिका राज्य सरकारच्या http://www.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याच बरोबर http://rmvs.maharashtra.gov.in/rmvs, http://www.cdacmumbai.in, http://bosslinux.in/support-centres/mumbai या वेबसाइटवरसुद्धा प्रवेशपत्रिका उपलब्ध आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहा मार्चपर्यंतच मुदत असून ऑनलाइन प्रवेशिका भरायची आहे.


वेबसाइटवर नव्या तंत्रज्ञानाचा केलेला वापर, इंटरअ‍ॅक्टिव्हनेस, साइट अपडेट होण्याचा कालावधी आणि अन्य सुविधा याबरोबरच वेबसाइटवरील मजकुराची मांडणी, त्याचा दर्जा आदी गोष्टींचा विचार केला जाणार आहे.

काही मराठी वेबसाइटस्..

इंटरनेटवरील मराठी वेबसाइटचा टक्का तसा कमीच आहे. त्यामुळे मराठीमधील सर्वोत्तम गोष्टींची माहिती इंटरनेवर इंग्रजीच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र हा मराठीचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील अशा काही वेबसाइट्सची निर्मिती झाली आहे. मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा मराठी वेबसाइटसाठी इंटरनेटवर असलेला स्कोप विचारात घेता हा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा आहे. या वेबसाइटविषयीची थोडक्यात माहिती या वेळीच्या स्मार्ट क्लिकमधून..


थिंक महाराष्ट्र


महाराष्ट्राचे सामर्थ्य जगासमोर प्रगट होऊन महाराष्ट्रातील लोकांचा चांगुलपणा, गुणवत्ता यांची माहिती सर्वदूर पसरण्यासाठी थिंक महाराष्ट्रया वेबसाइटची निर्मिती झाली आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी कर्तृवाची नोंद घेणे, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच मराठी समाज आणि संस्कृती यांच्याविषयी विकिपिडियाप्रमाणे माहितीचे संकलन करणे असा मुख्य उद्देश या वेबसाइटच्या निर्मितीमागे आहे. ‘थिंक महाराष्ट्रही केवळ एक वेबसाइट म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत होणा-या नव्या आणि चांगल्या गोष्टींना देण्यात आलेले एक प्रकारचे प्रोसाहनच आहे. थिंक महाराष्ट्रच्या या उपक्रमाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आणि त्यामधील सहभागी होण्यासाठी हा क्लिक आवश्यकच ठरतो.

वेबसाईट : www.thinkmaharashtra.in


मराठीसृष्टीनव्या स्वरूपात


मराठी संकेतस्थळांना भेटी देणा-यांना मराठीसृष्टीहे नाव अनोळखी नाही. मराठीतील उत्तम गोष्टी इंटरनेटमार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच या वेबसाइटची सुरुवात झाली असली तरी आता ही वेबसाइट नव्या स्वरूपात येत आहे. या वेबसाइटवर वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणा-या दोन हजार व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. केवळ माहितीच नव्हे तर त्यांची छायाचित्रं, ध्वनिफिती आणि चित्रफिती इ. संदर्भकोषही देण्यात आले आहेत. याशिवाय मराठीशी निगडित वेबसाइट्सची सूची, लेखसंग्रह, मराठी सॉफ्टवेअर आदी विभाग आहेत. इतकंच नव्हे तर तुम्हीदेखील यात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला माहिती असलेल्या मराठी व्यक्ती, त्यांची माहिती, त्यांची छायाचित्रं याविषयीची माहिती अपलोड करू शकतात. मराठीसृष्टीसाठी लॉगऑन करण्यासाठी अ‍ॅड्रेसबारवर www.marathisrushti.com असं टाइप करावं.


साहित्य संमेलन व्हाया ऑनलाइन


मराठीच्या पताका जगभर पोहोचवण्यासाठी बदलत्या काळानुसार केवळ देशात होणा-या साहित्य संमेलनाबरोबरच विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन सुरूझालं आहे. मराठीची ख्याती जगभर पोहोचवण्यासाठी आयोजकही ही संमेलनं वेबसाइटच्या माध्यमातून हायटेक करत आहेत.

दुबई येथे कालपासून सुरू झालेल्या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कित्येक जणांना इच्छा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही. मात्र त्यांना विश्व साहित्य संमेलनाची सगळी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाइटवर मराठीमधील काही उत्तम संकेतस्थळांची लिंक देण्यात आली आहे. दुबई साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी www.mmdubai.org या संकेतस्थळावर लॉगऑन करा. तर पुण्यात होणा-या 83 व्या मराठी साहित्य संमेलनचा वेबसाइटच्या माध्यमातून आढावा घेण्यासाठी www.sahityasammelan2010.com या वेबसाइटवर लॉगऑन करा. या दोन्ही वेबसाइट्स ऑर्कुट, ट्विटर आणि फेसबुक अशा सोशल नेटवर्किंग साइटबरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ब्लॉगच्या माध्यमांतूनही या वेबसाइट्स इंटरअ‍ॅक्टिव्ह करण्यात आल्या आहेत. मराठीची पताका जगभर पोहोचवणा-या या साहित्य चळवळीत वेबसाइटच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवण्यास हरकत नाही.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP