Saturday, March 20, 2010

पुस्तक वाचा, पुस्तक ऐका


‘स्मार्ट क्लिक’च्या मागील भागात ऑनलाइन दुर्मिळ पुस्तकांच्या वेबसाइटची माहिती आपण घेतली. इंटरनेटवर ही पुस्तकं मोफत वाचता येतात तशी ऐकताही येतात. अशा काही वेबसाइट्स इंग्रजीप्रमाणेच मराठीतही उपलब्ध आहेत. त्याविषयी..

आपल्या धकाधकीच्या दैनंदिनीत स्वत:साठी वेळ काढणं तसं कठीणच असतं. त्यात दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकं वाचण्याची इच्छा असूनही अनेकांची वाचनाची इच्छा अपूर्णच राहते. मात्र काही पुस्तक वाचण्याची सवय (एका ठिकाणी निवांतपणे बसून) नसल्यामुळे वेळ मिळत नसल्याने किंवा हवा तसा निवांतपणा न मिळाल्याने वाचनाच्या आनंदावर पाणी सोडावं लागतं. अशा मंडळीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पुस्तक ऐकण्याची सोय देणा-या इंटरनेटवरील वेबसाइट्स पर्वणी ठरल्या आहेत. इंग्रजी भाषेमध्ये अनेक पुस्तकं ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेतच. पण आता मराठीमध्येही असे प्रयोग छोट्या प्रमाणात सुरू झाले आहेत.

www.booksshouldbefree.com ही पुस्तकं ऐकण्यासाठी इंग्रजीतील एक उत्तम वेबसाइट आहे. या वेबसाइटवर 48 विभागात पुस्तकांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यात जगभरातील 25 भाषांतील पुस्तकं उपलब्ध आहेत. या वेबसाइटवरील पुस्तकं एमपी थ्री, आय टय़ूब्ज स्वरूपात डाऊनलोड करून घेता येतात. या वेबसाइटवरील वाचनासाठी म्हणजेच ऐकण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांविषयी थोडक्यात माहितीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लॉग-इन करण्याची आवश्यकता नाही.

आज तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग पाहता भविष्यात पुस्तकं वाचण्याऐवजी ऐकली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे एका ठिकाणी बसून पुस्तकं वाचणं ज्यांना शक्य नसतं त्यांच्यासाठी तर ही वेबसाइट फारच उपयुक्त आहे. मात्र इथे सध्या मराठी पुस्तकं उपलब्ध नाहीत.

मराठी पुस्तक ऐकण्यासाठी boltipustake.blogspot.com ब्लॉगवर आपल्याला क्लिक करावं लागेल. या ब्लॉगवरून मराठीतील काही जुनी पुस्तकं एमपी-थ्री स्वरूपात डाऊनलोड करता येतात. त्यासाठी कोणत्याही लॉग-इनची आवश्यकता नाही. साने गुरुजी यांच्या अनमोल गोष्टी श्यामची आई या दोन पुस्तकांसह आगरकर दर्शन आणि लोकहितवादींची शतपत्रं ही पुस्तकं सध्या या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. शिवाय या ब्लॉगवर तुम्ही स्वत:च्या आवाजात पुस्तक वाचून पाठवू शकता. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर मोफत मिळवण्याची माहितीही इथे देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आज मराठीतील जवळपास सर्व प्रकाशन संस्थांची स्वतंत्र वेबसाइट आहे. या वेबसाइटवरून आपण पुस्तकं विकत घेऊ शकतो. याशिवाय www.rasik.com आणि www.marathisahitya.com यांसारख्या वेबसाइट्सवरही मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यावरूनही पुस्तकं विकत घेता येतात. केवळ सह्याद्री पर्वतरांगांशी निगडित पुस्तकं विकत घेण्यासाठी www.sahyadribooks.org ही वेबसाइट उपयुक्त आहे. या वेबसाइटवरील पुस्तकं तर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. कादंबरी वाचनाची आवड असणा-यांसाठी www.marathinovels.net ही खास वेबसाइट उपलब्ध आहे. अर्थात हा एक ब्लॉग असून इथे अनेक कादंब-या ऑनलाइन वाचण्याची सोय आहे.

पण मराठी मासिकं आणि पुस्तकं फुकटात वाचायची असतील तर ebooks.netbhet.com ही वेबसाइट परफेक्ट आहे. या वेबसाइटवर मराठीमधील अनेक मासिकं आणि पुस्तकं डाऊनलोड करून घेता येतात. ही वेबसाइट केवळ मराठी पुस्तकांपुरती मर्यादित नसून अनेक महत्त्वाच्या लिंकही त्यावर पाहायला मिळतात. मराठी इंटरनेट विश्वाबद्दल अधिक रस असलेल्या नेटकरांनी हे क्लिक जरूर करायला हवेत.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP