दुर्मीळ खजिना ऑनलाइन
दुर्मीळ पुस्तकं मिळवण्यासाठी आता ग्रंथालयाची वाट धरण्याची आवश्यकता नाही. कारण मराठीसह संस्कृत, इंग्रजी, बंगाली, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, उर्दू या नऊ भारतीय भाषांतील जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं केंद्र सरकारने डिजिटल लायब्ररी स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध केली आहेत.
आजच्या युगात रोज घडणा-या घटनांची तपशीलवार माहिती छायाचित्रं आणि व्हिडिओसह इंटरनेटवर लगेचच सहज उपलब्ध होत असते. तरीही काही वर्षापूर्वीचे जुने संदर्भ मिळवण्यासाठी कित्येकदा बराच सर्च करावा लागतो. इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अगदी सर्व प्रकारच्या खरेदीची सोयही नेटवर उपलब्ध आहे. त्यात पुस्तकांचाही समावेश होतो. इंटरनेटवरून पुस्तक विकत घेण्याबरोबर ती वाचण्याची सोयही उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी हवी.
बाजारपेठेत आलेली नवी पुस्तकं इंटरनेटवर सहजरीत्या उपलब्ध आहेत. मात्र जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं वाचायची असतील किंवा त्यामधील काही संदर्भ हवे असतील तर मात्र काही मोजक्या शहरातील मोठ्या ग्रंथालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. अशी जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं संदर्भासाठी पटकन मिळाली तर अभ्यासक आणि साहित्यप्रेमींना याचा मोठा उपयोग होऊ शकतो. या दुर्मीळ पुस्तकांचं जतन करणं ही ब-यापैकी कठीण आणि खर्चिक गोष्ट असते. पण प्रत्येकालाच हे शक्य होईलच असं नाही. अशी दुर्मीळ पुस्तकं मिळवण्यासाठी आता ग्रंथालयाची वाट धरण्याची आवश्यकता नाही. कारण मराठीसह संस्कृत, इंग्रजी, बंगाली, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू, उर्दू या नऊ भारतीय भाषांतील जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं ऑनलाइन उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने ही पुस्तकं डिजिटल लायब्ररी स्वरूपात उपलब्ध केली आहेत.
या वेबसाइटवर मराठीतील तब्बल एक हजार सात जुनी आणि दुर्मीळ पुस्तकं (सुमारे दोन लाख 86 हजार 265 पानं) उपलब्ध आहेत.
देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांतील पुस्तकंही या डिजिटल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ, मुंबईतील गव्हर्मेट सेंट्रल प्रेस आणि मुलुंड येथील डिजिटल लायब्ररीची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे; तर राष्ट्रपती भवनाच्या ग्रंथालयातील जवळ जवळ पाच हजार पुस्तकं या वेबसाइटवर वाचनासाठी उपलब्ध आहेत. या वेबसाइटवरील पुस्तकांचा शोध पुस्तकांच्या तसेच लेखकांच्या नावानुसार, प्रकाशन वर्षानुसार त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या नावानुसार घेता येतो.
देशातील तब्बल एक लाख 78 हजार 376 जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांचा (6,05,57,257 पानं) मोफत खजिना या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
पुस्तकांबरोबरच नियतकालिकं, स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. याखेरीज या वेबसाइटवर अनेक महत्त्वाच्या लिंकही उपलब्ध आहेत. त्यावर क्लिक करून आणखी नव्या खजिन्यांचा आनंद लुटणं शक्य आहे.
तेव्हा पुस्तकांचा हा खजिना मिळवण्यासाठी लॉग ऑन करा- http://www.new.dli.ernet.in
0 comments:
Post a Comment