Friday, July 16, 2010

मल्टिटास्किंग एपिक

इंटरनेटवर सर्च करताना एकाच वेळी विविध अ‍ॅप्लिकेशन्स वापरावी लागतात. कधी माय कॉम्प्युटर, कधी सोशल नेटवर्किंग, तर कधी वर्डची फाईल.. अशा मल्टिटास्किंग गोष्टी एकाच ब्राऊझरमध्ये उपलब्ध करण्याची सोय एका भारतीय कंपनीने केली आहे. या गुणांमुळे इंटरनेट एक्स्प्लोरर, मॉझिला फायरफॉक्स, ओपेरा, सफारी आणि गुगलचे क्रोम या प्रस्थापित वेब-ब्राऊझर्सना टक्कर दिली आहे.



सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये भारतीयांनी जगभरात आपला दबदबा निर्माण केला असला तरी, इंटरनेवरील अनेक सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन्समध्ये भारतीय नेटकरांच्या गरजांचा विचार केला जात नाही. मात्र भारतीय नेटकरांच्या गरजांचा विचार करणारं एकं नवं ब्राऊझर नुकतंच निर्माण झालं आहे.

इंटरनेट वापरताना सर्वाचा ब्राऊझरशी संबंध येतो. प्रत्येक जण स्वत:ला सहज आणि सोपा वाटेल अशा ब्राऊझरचा वापर करत असतो. मात्र अशा ब्राऊझरमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्यास युझरला वाव नसतो. गुगल क्रोमने ब्राऊझरद्वारे युझर्सना काही नवे पर्याय दिले आहेत. क्रोमनंतर असा वेगळा प्रयोग बंगळूर येथील हिडन रिफ्लेक्स या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स, ओपेरा, सफारी आणि गुगलचे क्रोम या प्रस्थापित वेब-ब्राऊझर्सना टक्कर देणा-या या नव्या इंडियन ब्राऊझरचं एपिक असं नाव आहे. हे सॉफ्टवेअर विकसित करायला हिडन रिफ्लेक्सच्या इंजिनीअर्सना दोन वर्ष मेहनत घ्यावी लागली. एपिक हाताळायला अतिशय सोपा असून त्यात अनेक अ‍ॅप्लिकेशनचा समावेश करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर त्याचा स्पीडही इतर ब्राऊझरपेक्षा अधिक जलद आहे. त्यामुळेच सध्या उपलब्ध असलेल्या ब्राऊझरपेक्षा एपिक सरस ठरतो.

इंटरनेटचा वापर करताना अनेक जणांना मल्टिटास्किंग काम करावं लागतं. हेच लक्षात घेऊन एपिकचं मल्टिटास्किंग स्ट्रक्चर करण्यात आलं आहे. त्यामुळे एपिक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

एपिकचं वेगळेपण आहे ते त्याच्या साइडबारमध्ये. या साइडबारमुळे तुमचा इंटरनेटवरील सर्च अधिक स्मार्ट होण्यास मदत होणार आहे. कारण एपिकच्या साइडबारमध्ये तब्बल 26 अ‍ॅप्लिकेशन्स दिली आहेत. त्याचबरोबर त्यात भारतीय संस्कृती, प्रदेश, खेळ, चित्रपट, कला, निसर्ग अशा दहा विभागांतील दीड हजार थिम्स आणि वॉलपेपर्स देण्यात आले आहेत.

एपिकमध्ये विविध वैशिष्ट्यांचा भरणा आहे. इंटरनेट वापरताना तुम्हाला वर्डमध्ये काही टाईप करायचं असेल तर त्यासाठी वेगळी विंडो ओपन करायची गरज नाही कारण यावर रायटरची सोयही करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या रायटरमध्ये तब्बल 12 भारतीय भाषांमध्ये टाईप करता येतं.


एपिकच्या साइडबारमधील इंडिया अ‍ॅप्लिकेशनमध्ये भारतातील प्रमुख वृत्तपत्रांतील बातम्या, वाहिन्यांवरील बातम्या, क्रिकेट स्कोअर, शेअर बाजारातील अपडेटही पाहू शकता. याशिवाय संगीत, भारतीय व्हिडीओदेखील तुम्हाला पाहता येतील.

इतक्या सोयी असताना सोशल नेटवर्किंगची सोय विसरून कशी चालेल? फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट आशा सोशल नेटर्किंग साइट्स त्याच्या साइडबारवर उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या ऑफिसमध्ये अशा सोशल नेटवर्किंग साइट अ‍ॅक्सेस करण्यास मनाई आहे त्यांना हा साइडबार उपयुक्तच ठरणार आहे. व्हिडीओ साइडबारमध्ये युट्यूबवरील व्हिडीओही पाहू शकता.

सर्फिग करताना अनेक वेळा कित्येक चांगल्या गोष्टी सापडतात. पण कामाच्या गडबडीत ती विशिष्ट लिंक किंवा फोटो सेव्ह करणं कधी कधी शक्य होत नाही. मात्र ही अडचण एपिकने दूर केली आहे. साइडबारमधील स्निपेट्समध्ये सर्च करत असताना सापडलेली लिंक अथवा फोटो तुम्ही तत्काळ सेव्ह करू शकता.

स्निपेट्समधील न्यू नोटमध्ये हवी असलेली लिंक किंवा फोटो केवळ ड्रॅग करून सेव्ह करता येतो.

कॉम्प्युटरमध्ये अत्यंत उपयुक्त असलेली गोष्ट म्हणजे अँटिव्हायरस. एपिकमध्ये हा अँटिव्हायरस इन-बिल्ट आहे. त्यामुळे वेगळा अँटी-व्हायरस डाऊनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही. हा जगातील पहिला अँटिव्हायरस ब्राऊझर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सर्च करताना एखाद्या फोल्डरमधील फाइल ओपन करायची असल्यास प्रत्येक वेळी ब्राऊझर मिनिमाइज करावा लागतो. पण एपिक वापरताना ब्राऊझर मिनिमाइज न करता तुमच्या पीसीमधील कोणतीही फाइल तुम्ही ओपन करू शकता.

गुगल मॅपच्या मदतीने आपण जगातील कोणतंही ठिकाण पाहू शकतो. एपिकने याहीपुढे एक पाऊल टाकलं आहे. साइडबारमध्ये असलेल्या एपिक मॅपमध्ये तर तुम्ही प्रवासाचा पूर्ण मार्ग पाहू शकता. उदा. पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर ही दोन स्थळं तिथे दिलेल्या ऑप्शनमध्ये टाईप केली की तो संपूर्ण मार्ग मॅपमध्ये दाखवला जातो. प्रवास कसा करणार आहात याचेही पर्याय (रस्त्यावरून, रेल्वे.आदी) निवडू शकता. त्याचप्रमाणे तुमचा प्रवास किती किलोमीटरचा असेल? हा प्रवास रस्ता मार्गे कसा आणि किती वेळात होईल? याची माहितीही या साइडबारमध्ये दिली जाते.

तसेच विमान, रेल्वे प्रवासासाठीचं बुकिंग करू शकता. याशिवाय या साइडबारमधून जॉब सर्च करू शकता. टू डॉसमध्ये दिवसभरातील कामाच्या नोंदीही तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. वेळेचं भान ठेवण्यासाठी टायमर किंवा अलार्मदेखील सेट करू शकता.

नियमितपणे सर्च करत असलेल्या वेबसाइटची यादी सेव्ह करण्याचीही सोय कलेक्शन्स’(collections )मध्ये आहे.

एपिकमध्ये समाविष्ट केलेली अ‍ॅप्लिकेशन्स इतकी प्रभावी आहेत की ही अ‍ॅप्लिकेशन्स अन्य ब्राऊझर्समध्ये काही दिवसांनी दिसली तर अश्चर्य वाटायला नको. हा ब्राऊझर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एपिकच्या निर्मात्यांनी म्हटल्याप्रमाणे हा ब्राऊझर तुमचा New Best Friend यात काही शंका नाही.

1 comments:

Unknown July 23, 2010 at 2:34 PM  

Now it's time to push our browser top of the world..

Proud to be an Indian ...

This browser will repeat it again.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP