Showing posts with label मराठी वेबसाईट. Show all posts
Showing posts with label मराठी वेबसाईट. Show all posts

Sunday, September 19, 2010

प्रबोधनकार तुमच्यापर्यंत!

आपल्याला हवा असणारा संदर्भ शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. मात्र इंटरनेटवर मिळणारी माहिती ही प्रसिद्ध आणि सर्वज्ञात असते. त्यातही मराठीतून एखादा संदर्भ मिळणं अधिकच कठीण. कारण यासाठी आवश्यक वेबसाइट मराठीतून तयार झालेल्या नाहीत. मात्र आता महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणा-या व्यक्तीची माहिती इंटरनेटवर मराठीतून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नुकतीच थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनचरित्रावरीलं www.prabodhankar.com ही वेबसाइट नुकतीच लाँच करण्यात आली आहे.



या वेबसाइटवर प्रबोधनकारांनी लिहिलेली पुस्तकं आणि अप्रकाशित लेख ठेवण्यात आले आहेत. हे लेख पीडीएफ स्वरूपात असून ते डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. प्रबोधनकारांवर लिहिलेली पुस्तकं, पीएचडीचे प्रबंध, प्रासंगिक लेख आणि त्यांच्याविषयी अन्य ठिकाणी लिहून आलेले लेख या ठिकाणी एकत्रितपणे देण्यात आले आहेत. तसेच प्रबोधनकारांचे फोटो, व्हिडिओ, वॉलपेपर देण्यात आले आहेत.

या वेबसाइटचं स्वरूप युझर फ्रेंडली ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यात एक त्रुटी जाणवते. प्रबोधनकारांच्या संदर्भात एखादा संदर्भ शोधण्यासाठी त्या ठिकाणी सर्चचा पर्याय नाही. मराठी अथवा इंग्रजीमध्ये सर्चचा तो पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या साइटच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या साहित्यावर आणि विचारांवर ऑनलाइन चर्चसत्रंही आयोजित करता येतील. इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव पाहता या साइटने ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइटशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. या माध्यमातून साइटची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकेल.

या साइटची संकल्पना पत्रकार सचिन परब यांची असून हा प्रयोग केवळ एका साइटपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील अन्य कर्तृत्ववान व्यक्तीचे अशा प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन करण्याची परब यांची योजना आहे. मराठी भाषेचा इंटरनेटवरील टक्का वाढवण्यासाठी केलेली ही कल्पना निश्चितच अभिनंदनीय आहे.



Friday, July 9, 2010

‘पंढरी’ची ‘वारी’ऑनलाइन

आषाढी कार्तिकीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या वारीत ठिकठिकाणाहून भक्तगण सहभागी होत असतात. नेहमीच्या वारक-यासाठी ही काही नवी गोष्ट नाही. मात्र नव्याने सहभागी होणा-यांसाठी वारीला नेमकी कुठून सुरुवात करायची? हा मोठा प्रश्न असतो. मात्र 'पंढरी' आणि 'वारी' या दोन वेबसाईटच्या माध्यमातून अशा प्रश्नांची उत्तर मिळणं सोपं झालं असून वारी आता जगभरात पोहोचली आहे.

तेराव्या शतकापासून सुरू असलेल्या पंढरीची वारी वेबसाइटच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. लाखोंच्या संख्येने वारीत सहभागी होणारे वारकरी आणि वारीचा समृद्ध इतिहासाची माहिती ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी ग्लोकल डिजीकॉमन pandhari.org नावाची एक वेबसाईट सुरू केली आहे. यामध्ये वारीचा इतिहास, वैशिष्टं, संप्रदाय,दिनक्रम आणि वारीचा मार्ग अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील संतांची परंपरा,वर्षातून होणा-या चार वारींची छायाचित्रं अशी संपूर्ण माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. वारीमध्ये सहभागी होऊन वारीची काढलेली छायाचित्रंही तुम्ही या वेबसाइटवर पाठवू शकता. त्याचप्रमाणे संदेश भंडारे यांनी टिपलेली वारीची दुर्मीळ छायाचित्रंही तुम्ही पाहू शकता.




www.pandhari.com या वेबसाईटच्या माध्यमातून वारीची पारंपरिक माहिती मराठीत उपलब्ध आहे, मात्र जगभरातील लोकांना वारी आणि त्याच्या भक्ती संप्रदायाची माहिती कळण्यासाठी ती इंग्रजीतून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वारीबद्दल सर्व माहिती ग्लोबल करण्याचे काम www.waari.org या वेबसाइटने केले आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना कोणाला वारीला पहिल्यांदाच जायचं त्यांना नेमकी कशी आणि कुठून सुरुवात करायची याबाबत कोणालाच काहीच माहिती नसते. त्यामुळे यंदा वारीला कोणत्या दिवशी सुरुवात होणार आहे? कधी निघणार आहे? वारीचा मार्ग कसा आहे? वारीत सहभागी व्हायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करावा? म्हणजेच वारीची संपूर्ण माहिती आणि वारीशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाईटमुळे सहज मिळणार आहेत. ऑनलाइनच्या जमान्यात विठ्ठलाला भेटण्याचा हा एक अनोखा मार्ग ठरू शकतो.


Saturday, April 17, 2010

ऑनलाइन पॉलिटिक्स


मराठी पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशीमहापॉलिटिक्स.कॉम नावाची वेबसाइट पी4पी या माध्यम संस्थेने तयार केली आहे. राजकारण आणि पत्रकारिताया क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी युनिक वेबसाइट म्हणून ती नावारूपाला आली आहे.

इंटरनेटच्या विश्वात मराठी पत्रकारांना उपयुक्त असणारी माहिती देणारी वेबसाइट्स शोधण्याचा प्रयत्न केल्यास केवळ प्रत्येक वृत्तपत्राच्या वेबसाइट आणि काही पत्रकारांचे ब्लॉग अशाच वेबसाइट्स मिळतात. मराठी पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशी महापॉलिटिक्स.कॉम नावाची वेबसाइट पी4पी या माध्यम संस्थेद्वारे तयार केली असून ही राजकारण आणि पत्रकारिता या क्षेत्रातील माहिती देणारी युनिक वेबसाइट ठरली आहे.

राजकारण, प्रशासन आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील ताज्या घडामोडींची माहिती या वेबसाइटवर मिळणार आहे. पत्रकारांना दैनंदिन कामकाजासाठी लागणारे अत्यावश्यक संदर्भ या ठिकाणी देण्यात आले आहे. यात प्रेस रिलिज, महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्स, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, मराठी माध्यमामध्ये होणा-या घडामोडी याशिवाय पत्रकारांच्या बदल्या, त्याचे वृत्तपत्रातील लेखन, ब्लॉग, ताज्या घडामोडी अशी एकत्रित केलेली उपयुक्त माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

महत्त्वाचं म्हणजे राजकारणात असलेल्या आणि महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या सनदी अधिका-यांचे थेट संपर्कही या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचा फायदा पत्रकारांबरोबरच सामान्य लोकांनाही होणार आहे हे निश्चित.

इंटरनेटवरील माहितीच्या प्रचंड साठय़ात जगातल्या कोणत्याही गोष्टीचे संदर्भ इंग्रजीमध्ये पटकन उपलब्ध होतात मात्र आपल्या आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक संदर्भ शोधण्यासाठी मात्र इंटरनेटचे जाळे अपूरे पडते, याचा विचार करून महापॉलिटिक्सवर महाराष्ट्राचा संदर्भकोष देण्यात आला आहे. या संदर्भकोषामध्ये प्रत्येक राज्याचा राजकीय इतिहास, जिल्ह्यांची, राजकीय पक्षांची तसेच आतापर्यंत झालेल्या निवडणुकांची इत्थंभूत माहिती त्याच्या आकडेवारीसह देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर राज्यातील महत्त्वाच्या संस्था, देश आणि राज्य पातळीवरील राजकारणात असलेल्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीचे प्रोफाइल त्याच्या सध्याच्या पदासह या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.

माहितीवरील केवळ प्रसारमाध्यमांची मक्तेदारी मोडून काढण्याचा माहापॉलिटिक्सच्या निर्मात्याचा प्रयत्न पहिल्या टप्यात यशस्वी ठरल्याचे या वेबसाइटला भेट दिल्यानंतर जाणवते. इंरनटेच्या विश्वात मराठीचा आणि त्यातही पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन अशा वेगळ्याच क्षेत्राची माहिती देणा-या या उपक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी लॉगऑन करा- http://mahapolitics.com

Friday, March 5, 2010

काही मराठी वेबसाइटस्..

इंटरनेटवरील मराठी वेबसाइटचा टक्का तसा कमीच आहे. त्यामुळे मराठीमधील सर्वोत्तम गोष्टींची माहिती इंटरनेवर इंग्रजीच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र हा मराठीचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील अशा काही वेबसाइट्सची निर्मिती झाली आहे. मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा मराठी वेबसाइटसाठी इंटरनेटवर असलेला स्कोप विचारात घेता हा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा आहे. या वेबसाइटविषयीची थोडक्यात माहिती या वेळीच्या स्मार्ट क्लिकमधून..


थिंक महाराष्ट्र


महाराष्ट्राचे सामर्थ्य जगासमोर प्रगट होऊन महाराष्ट्रातील लोकांचा चांगुलपणा, गुणवत्ता यांची माहिती सर्वदूर पसरण्यासाठी थिंक महाराष्ट्रया वेबसाइटची निर्मिती झाली आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी कर्तृवाची नोंद घेणे, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच मराठी समाज आणि संस्कृती यांच्याविषयी विकिपिडियाप्रमाणे माहितीचे संकलन करणे असा मुख्य उद्देश या वेबसाइटच्या निर्मितीमागे आहे. ‘थिंक महाराष्ट्रही केवळ एक वेबसाइट म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत होणा-या नव्या आणि चांगल्या गोष्टींना देण्यात आलेले एक प्रकारचे प्रोसाहनच आहे. थिंक महाराष्ट्रच्या या उपक्रमाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आणि त्यामधील सहभागी होण्यासाठी हा क्लिक आवश्यकच ठरतो.

वेबसाईट : www.thinkmaharashtra.in


मराठीसृष्टीनव्या स्वरूपात


मराठी संकेतस्थळांना भेटी देणा-यांना मराठीसृष्टीहे नाव अनोळखी नाही. मराठीतील उत्तम गोष्टी इंटरनेटमार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच या वेबसाइटची सुरुवात झाली असली तरी आता ही वेबसाइट नव्या स्वरूपात येत आहे. या वेबसाइटवर वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणा-या दोन हजार व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. केवळ माहितीच नव्हे तर त्यांची छायाचित्रं, ध्वनिफिती आणि चित्रफिती इ. संदर्भकोषही देण्यात आले आहेत. याशिवाय मराठीशी निगडित वेबसाइट्सची सूची, लेखसंग्रह, मराठी सॉफ्टवेअर आदी विभाग आहेत. इतकंच नव्हे तर तुम्हीदेखील यात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला माहिती असलेल्या मराठी व्यक्ती, त्यांची माहिती, त्यांची छायाचित्रं याविषयीची माहिती अपलोड करू शकतात. मराठीसृष्टीसाठी लॉगऑन करण्यासाठी अ‍ॅड्रेसबारवर www.marathisrushti.com असं टाइप करावं.


साहित्य संमेलन व्हाया ऑनलाइन


मराठीच्या पताका जगभर पोहोचवण्यासाठी बदलत्या काळानुसार केवळ देशात होणा-या साहित्य संमेलनाबरोबरच विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन सुरूझालं आहे. मराठीची ख्याती जगभर पोहोचवण्यासाठी आयोजकही ही संमेलनं वेबसाइटच्या माध्यमातून हायटेक करत आहेत.

दुबई येथे कालपासून सुरू झालेल्या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कित्येक जणांना इच्छा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही. मात्र त्यांना विश्व साहित्य संमेलनाची सगळी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाइटवर मराठीमधील काही उत्तम संकेतस्थळांची लिंक देण्यात आली आहे. दुबई साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी www.mmdubai.org या संकेतस्थळावर लॉगऑन करा. तर पुण्यात होणा-या 83 व्या मराठी साहित्य संमेलनचा वेबसाइटच्या माध्यमातून आढावा घेण्यासाठी www.sahityasammelan2010.com या वेबसाइटवर लॉगऑन करा. या दोन्ही वेबसाइट्स ऑर्कुट, ट्विटर आणि फेसबुक अशा सोशल नेटवर्किंग साइटबरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ब्लॉगच्या माध्यमांतूनही या वेबसाइट्स इंटरअ‍ॅक्टिव्ह करण्यात आल्या आहेत. मराठीची पताका जगभर पोहोचवणा-या या साहित्य चळवळीत वेबसाइटच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवण्यास हरकत नाही.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP