विकिमीडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येतात. यात तुम्हाला सुप्रसिद्ध व्यक्तींची वचनं, भाषणं, सुविचार, म्हणी, छायाचित्रं, संगीत, व्हिडिओ याचबरोबर बातमी देण्यातही सहभागी होऊ शकतात. या प्रकल्पांची ही माहिती...
इंटरनेटच्या विश्वात जगभरातील 250हून अधिक भाषांतून अनेक विषयांवर माहिती मोफत उपलब्ध करणा-या विकिमीडिया फाऊंडेशनच्या विकिबुक्सविषयी माहिती आपण मागील लेखात घेतली होती, मात्र या फाऊंडेशनचे काम विकिपीडियापुरतेच मर्यादित नाही. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याद्वारे अनेक प्रकल्प राबवले जातात. विकिमीडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येतात. यात तुम्हाला सुप्रसिद्ध व्यक्तींची वचनं, भाषणं, सुविचार, म्हणी तसंच विविध छायाचित्रं, संगीत, व्हिडिओ यांचा साठा उपलब्ध होणार आहे. शिवाय एखाद्या भाषेचं कसबही घरबसल्या आत्मसात करू शकाल. इतकंच नव्हे; तर एखादी बातमीदेखील तुम्हाला लिहिता येणार आहे. मात्र विकिमीडिया फाऊंडेशनच्या या सर्व प्रकल्पांमधील माहितीचा वापर करण्यासाठी काही अटी आणि नियमांचं पालन करावं लागेल. विषेशत: छायाचित्रं आणि व्हिडिओचा वापर करताना ही काळजी घ्यावी लागते.
विकिक्वोट्स अर्थात अवतरणे- विकिमीडिया फाऊंडेशनच्या विकिक्वोट्स या विभागात सुप्रसिद्ध व्यक्तींची वचनं, भाषणं, त्याच बरोबर सुविचार, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा संग्रह आहे. अर्थात, विकिपीडियाप्रमाणेच याचे स्वरूप असून 50हून अधिक भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. यातील सर्वाधिक मजकूर इंग्रजीमध्ये असला तरी त्याची मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे. विकिकोटच्या मुख्य पानावर जाण्यासाठी पुढील संकेतस्थळावर क्लिक करा - http://en.wikiquote.org/wiki/Main_Page
विकिमीडिया कॉमॉन्स- इंटरनेटवर छायाचित्रं, व्हिडिओ, नकाशे, संगीत मोफत उपलब्ध असणा-या भरमसाट वेबसाइट्स आहेत. विकिकॉमॉन्सही एक त्यातलाच प्रकार असून जगातील प्रत्येक विषयानुसार त्याची छायाचित्रं आणि व्हिडिओ उपलब्ध असतील. विकिकॉमॉन्सवर जाण्यासाठी क्लिक करा- http://commons.wikimedia.org/wiki/Main_Page
विकिस्पेसिस अर्थात प्रजातिकोश- सृष्टीतील विविध प्रजातींची माहिती एकत्रित करण्यासाठी विकिस्पेसिस या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजंतू याविषयीची माहिती देण्यात आली आहे. माष प्रजातिकोशसाठी अद्याप मराठी आवृत्ती सुरू झालेली नाही. विकिस्पेसिसवर जाण्यासाठी क्लिक करा - http://species.wikimedia.org/wiki/Main_Page
विकिन्यूज- प्रसारमाध्यमं लोकांना बातम्या देण्याचं काम करतात. विकिमीडियाने विकिन्यूजच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाला लोकांच्या स्वाधीन केलं आहे. विकिन्यूजमध्ये जगाच्या कानाकोप-यातील कोणतीही व्यक्ती बातम्या किंवा लेख लिहू शकते, मात्र यासाठी विकिन्यूजवर तुमची नोंदणी असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला http://en.wikinews.org/wiki/Main_Page या लिंकवर क्लिक करावं लागेल.
विकिविद्यापीठ- जागतिक पातळीवर मुक्त शिक्षणाची संधी निर्माण करण्याच्या हेतूने विकिमीडियाने या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. अर्थात, विकीच्या अन्य प्रकल्पांच्या साहाय्यानेच विकिविद्यापीठाची वाटचाल सुरू झाली आहे. सध्या इंग्रजीसह अन्य अकरा भाषांमध्ये या विद्यापीठाची रचना करण्याचे काम सुरू आहे. यापैकी इंग्रजी विद्यापीठाच्या आवृत्तीमध्ये प्रथमिक शिक्षणापासून प्रत्येक विषयाची सोय केली आहे. विकिविद्यापीठाला भेट देण्यासाठी http://en.wikiversity.org/wiki/Wikiversity:Main_Page या लिंकवर क्लिक करावं लागेल.
विकिशब्दकोष- विविध भाषा आणि त्या भाषांमधील शब्द शिकण्यासाठी विकिशब्दकोष तयार करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला हवी ती भाषा घरबसल्या शिकता येणार आहे. http://en.wiktionary.org/wiki/Wiktionary:Main_Page
मेटा विकी- विकिमीडियाच्या वरील सर्व प्रकल्पाची व्याप्ती पाहता या सर्वामध्ये काही समन्वय असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधण्याचं काम मेटा विकी ही वेबसाइट करते.