Sunday, September 19, 2010

प्रबोधनकार तुमच्यापर्यंत!

आपल्याला हवा असणारा संदर्भ शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. मात्र इंटरनेटवर मिळणारी माहिती ही प्रसिद्ध आणि सर्वज्ञात असते. त्यातही मराठीतून एखादा संदर्भ मिळणं अधिकच कठीण. कारण यासाठी आवश्यक वेबसाइट मराठीतून तयार झालेल्या नाहीत. मात्र आता महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणा-या व्यक्तीची माहिती इंटरनेटवर मराठीतून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नुकतीच थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनचरित्रावरीलं www.prabodhankar.com ही वेबसाइट नुकतीच लाँच करण्यात आली आहे.



या वेबसाइटवर प्रबोधनकारांनी लिहिलेली पुस्तकं आणि अप्रकाशित लेख ठेवण्यात आले आहेत. हे लेख पीडीएफ स्वरूपात असून ते डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. प्रबोधनकारांवर लिहिलेली पुस्तकं, पीएचडीचे प्रबंध, प्रासंगिक लेख आणि त्यांच्याविषयी अन्य ठिकाणी लिहून आलेले लेख या ठिकाणी एकत्रितपणे देण्यात आले आहेत. तसेच प्रबोधनकारांचे फोटो, व्हिडिओ, वॉलपेपर देण्यात आले आहेत.

या वेबसाइटचं स्वरूप युझर फ्रेंडली ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यात एक त्रुटी जाणवते. प्रबोधनकारांच्या संदर्भात एखादा संदर्भ शोधण्यासाठी त्या ठिकाणी सर्चचा पर्याय नाही. मराठी अथवा इंग्रजीमध्ये सर्चचा तो पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या साइटच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या साहित्यावर आणि विचारांवर ऑनलाइन चर्चसत्रंही आयोजित करता येतील. इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव पाहता या साइटने ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइटशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. या माध्यमातून साइटची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकेल.

या साइटची संकल्पना पत्रकार सचिन परब यांची असून हा प्रयोग केवळ एका साइटपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील अन्य कर्तृत्ववान व्यक्तीचे अशा प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन करण्याची परब यांची योजना आहे. मराठी भाषेचा इंटरनेटवरील टक्का वाढवण्यासाठी केलेली ही कल्पना निश्चितच अभिनंदनीय आहे.



0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP